माझी केनिया सफर

भाग क्र. 13

एकदा मी विमानतळाकडे पहाटे जात असतांना ,एक माणूस मधेच आडवा आला , तेव्हा आमचा ड्राइव्हर म्हणे , शनिवारी व रविवारी जपून गाडी चालवावी लागते ,कारण तेथील तरुणाई शुक्रवारी व शनिवारी रात्री नाईट क्लब मध्ये जातात , कॅसिनोत जातात , आणि पहाटे तर्रर्र होऊन बाहेर पडतात . “त्रिदेव” या पिक्चर मध्ये केनियाच्या कॅसिनोतील शूटिंग आहे.
केनियन लोक मांसाहार खूप करतात .कुठल्याही प्राण्यांचे मांस ते खातात , त्यात कोंबडी, बकरी, डुक्कर, गाय, बैलच काय जिराफचेही मांस ते खातात .ते मांस शक्यतो उकडून किव्वा भाजून खातात . नुसते मीठ घालून स्वयंपाक करतात ,पण भारतीयांमुळे आता काहीजणांना तिखट खायची सवय लागली आहे . संध्याकाळी त्यांना बिअर व सिगारेट मिळाली की स्वर्गसुख !!
इथे मुलीं नवऱ्याच्या पैशावर अवलंबून राहत नाहीत .स्वतः काहीतरी कामधंदा ,नोकरी करतात .फॅशन हा त्यांचा अगदी विकपॉईंट आहे .कृत्रिम केसांचे विग त्या आवडीने लावतात .दर सोमवारी नवीन केसांची रचना दिसते .मुली कपड्यावर व केसांवर खूप खर्च करतात .
केनियात फ्री सेक्स कल्चर आहे .मुली आवडत्या मुलाबरोबर फिरतात ,त्याच्याबरोबर लग्नाशिवाय राहतात , त्याला त्यांच्या आई वडिलांचाही विरोध नसतो .मुलेही होऊ देतात ,ती मुले घेऊन कधी कधी आई वडिलांकडेच राहतात .नवऱ्याने किंवा मित्राने मुलांसाठी पैसे द्यावेत अशीही अपेक्षा त्या करत नाही .स्वतःच्या हिमतीवर मुल वाढवतात .जोस्फिनला मी विचारले ,तुझे लव्ह की अरेंज marriage ? तर ती म्हणे, अरेंज ! आणि हळूच सांगते , मला पसंत नव्हता तो !!
अगोदर मुले होऊ देतात व सवडीने गरज वाटली तर लग्न करतात .मी एका अशा लग्नाला गेले होते ,त्या जोडप्याला चार मुले होती .
केनियन लोक खूप काटक असतात .दिवसभर न थकता ते शारीरिक कष्टाचे काम करू शकतात .कामवाल्याही कितीही काम सांगितले तरी न कंटाळता, न थकता दिवसभर काम करू शकायच्या .तेथील स्रिया तर बाळंतपणानंतर चौथ्या दिवशी नेहमीचे काम करायला लागतात .
काही जमातीत लग्नात मुलीला हुंडा द्यावा लागतो , तोही गायीच्या स्वरूपात !
केनियाचे लोक खूप धार्मिक असतात ,त्यांना रविवारी काही कामाला बोलावले तर सरळ नकार देतात , कारण रविवारी सकाळी चर्च ला जाणे त्यांचे निश्चित असते .तेथे बहुसंख्य ख्रिश्चन तर थोडे मुस्लीम धर्मीय लोक आहेत .पण फारशा धार्मिक दंगली होताना दिसत नाहीत .
केनियात गल्लीबोळात फुटबॉल चे वेड आहे .
मॅचच्या वेळी स्टेडियम खचाखच भरलेले असते .कायम कुठल्या तरी क्लब च्या मॅचेस चालू असतात .त्यांच्या काटकपणामुळे मॅरेथॉन स्पर्धा ही ते नेहमीच जिंकत असतात .
केनियन लोकांच्या वागण्या बोलण्यात ब्रिटिशांचा प्रभाव जाणवतो , कारण १९६४ साली केनिया स्वतंत्र झाले .स्वातंत्र्यापूर्वी ह्या लोकांना गुलामासारखी वागणूक मिळायची .
तिथे तीन मुख्य जमाती आहेत- लिओ ,किकुयु व जंगलात राहणारी मसाई जमात .मसाई जमातीत अशी पद्धत होती की , मुलाचे लग्न तेव्हाच करायचे जेव्हा तो भाल्याने वाघ मारून आणेल .परंतु ही प्रथा आता वाघांच्या घटत्या संख्येमुळे बंद करण्यात आली आहे .
तेथील लोक संगीत प्रेमी आहेत ,कुठलेही गाणे लागू द्या , नाच मात्र एकाच प्रकारचा असतो .
तिथे भाषेचा फारसा प्रश्न येत नाही ,कारण बहुतेक सर्वांना इंग्रजी येते ,त्यात कामवाली, ड्राइवर ही आले .
भरपूर पावसामुळे जंगले ही भरपूर ,त्यामुळे प्राणी जीवनात खूप वैविध्य आढळते .डिस्कवरी चॅनेल वर दिसणाऱ्या बऱ्याच फिल्म्स केनियात चित्रीत केलेल्या असतात .
सुरुवातीला घरी दूधवाला आला तेव्हा त्याला विचारले की, दूध म्हशीचे की गायीचे ? तो हे ऐकून संभ्रमातच पडला , कारण तिथे म्हैस हा जंगली प्राणी आहे. त्यामुळे तिथे दूध फक्त गायीचे असते .
केनियाचा एक भाग डोंगराळ आहे त्याला रिफ्ट व्हॅली असे म्हणतात .तिथून जवळच विषुववृत्ताची रेघ जाते. तिथेच जगातील तिसऱ्या क्रमांकाचा, गोड्या पाण्याचा सरोवर आहे ” लेक व्हिक्टोरिया”.तो केनिया , टांझानिया , व युगांडा या तीन देशांच्या बॉर्डरवर आहे .Mount Kenya हा अवघड पर्वतारोहनातील एक पर्वत आहे .
आता हळूहळू पर्यटन व पर्यावरणाचा विचार तिथे होऊ लागला आहे .त्यामुळे प्लास्टिक वर गेल्या ऑगस्ट पासून बंदी घालण्यात आली आहे .
असा हा निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला केनिया !! पण गरिबांना पोटाची खळगी भरायची भ्रांत पडलेली असते , त्यांना याची जाणिवच नाही की आपलयाकडे एवढा खजिना आहे..!!
अश्या प्रकारे माझे केनियावर निरतिशय प्रेम आहे व मला वारंवार तेथे जावेसे वाटते….!!!

केनियावर तसे लिहण्यासारखे खूप आहे पण आता विराम घेते.

समाप्त.

डॉ अंजली संजीव पवार.

Advertisements

माझी केनिया सफर

भाग क्र. 12

संजीव कुवेत देशातील वास्तव्याला कंटाळून गेले होते , त्या दरम्यान श्री चिमुरकरांचा फोन आला ,” येता का परत केनियात ?” संजीव अगोदर च्या चोरी प्रकरणामुळे विचारात पडले .परंतु मी तर मनाने केव्हाच केनियात पोचले सुद्धा..!!!
कारण एखाद्या वाईट घटनेमुळे शंभर चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष का करावे असे मला वाटले . जेव्हा यांचे परत केनियाला जायचे ठरले, तेव्हा मला आनंद झाला , कारण केनिया च्या निसर्गाने व तेथील लोकांच्या साधेपणामुळे मी मोहित होतेच .
मी प्रथम जेव्हा केनियाच्या विमानतळावर उतरले , तेव्हा तिथे सगळीकडे काळे लोक बघून जरा घाबरलेच .पण नंतर त्यांच्या प्रेमळपणामुळे, त्यांच्या रंगाचे विशेष काही वाटेनासे झाले .
केनिया मध्ये श्रीमंत व गरीब यांच्यामध्ये खूप मोठी दरी जाणवते .तेथे मध्यमवर्ग आढळतच नाही .काही ठिकाणी महालासारखी घरे तर एकीकडे बकाल झोपडपट्टी .याला कारण भ्रष्टाचार ही असावे .साध्या साध्या सुविधा ही गरीब लोकांना मिळत नाही .तरीही लोक फारशी तक्रार करत नाही .गरीब लोक तर उद्याचा विचारही करत नाही .
तेथे शिक्षण घेणे खूप महाग आहे .गरिबांना १२ वी च्या पुढे शिक्षण घेणेही परवडत नाही .करीअरचा विचार तर फार लांब .फार थोडे लोक उच्च शिक्षण घेऊ शकतात .
सुपीक जमीन असूनही फारसे काही पिकवतांना दिसत नाही .मला काही ठिकाणी हातानेच थोडी जागा खणून मका लावतांना दिसले . मका हे त्यांचे मुख्य अन्न. मक्याचे पीठ शिजवून त्याचा ‘उगाली ‘ हा पदार्थ बनवतात .तिथे ‘अवोकडो’ या फळांची झाडे खूप आढळली.पालकासारखी पाने असलेली भाजी ‘सुकोमाविकि’ ते रोज आहारात वापरतात .
तेथे बैल किव्वा नांगरणी काही दिसली नाही .काही डोंगरावर चहा-कॉफीचे मळे दिसले तर काही ठिकाणी गुलाबाची शेती दिसली.
केनियात वर्षातून दोन वेळा पाऊस पडतो .एक लॉंग रेन व एक शॉर्ट रेन. जमीन सुपीक ,एवढा दोनदा पडणारा पाऊस, तरी त्यांनीं शेतीत फारशी प्रगती केली नाही .
जीवनावश्यक गोष्टी तर भारतातूनच निर्यात होतात . उद्योगधंदे अजून फारसे दिसत नाही , त्यामुळे तरुणांना नोकरी नाही आणि म्हणून चोऱ्यामाऱ्या करतात. त्यातही परदेशी व भारतीय लोकांना लुटण्याचे प्रमाण अधिक दिसते .त्यामुळे रात्रीबेरात्री फिरणे तिथे धोक्याचे ठरू शकते .
काही तरुण मात्र धडपड करतांना दिसले . कोणी सायकल वर डबलसीट बसवून वाहतूक करून पैसे कमावतात तर कोणी मोटारसायकल वर मागे बसवून वाहतूक करतात .असे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, सायकल व मोटारसायकलवाले आपापल्या गाड्या-सायकलला मात्र खूप सजवतात.
शहरात रस्ते चांगले आहेत ,पण खेड्यात अजून ही मातीचे कच्चेच रस्ते दिसतात .कोकणासारखी लाल माती दिसते . रस्त्यांचे जाळे नीट नसल्याने माझी कामवाली तीन गाड्या बदलून आईकडे जायची .रेल्वेही तेव्हढी विकसित नाहीये .संध्याकाळी ट्रॅफिक जॅमची मात्र शहरात खूप डोकेदुखी असते .
पण जशी परिस्थिती अगोदर होती, त्यात आता खूपच बदल झाला आहे. केनियाची प्रगतीच्या मार्गावर, मार्गक्रमणा चालू आहे….

आवोकाडो चे फळ

क्रमशः

डॉ अंजली पवार

माझी केनिया सफर

भाग क्र. 11

माझा गुजराथी लोकांशी प्रथमच जवळून संबंध आला तो केनियात गेल्यावर . केनियात कुठेही जा ,कोणत्याही शहरात जा ,तिथे गुजराती लोक दिसणारच .
माझ्या शेजारी सुशीलाबेन राहायच्या .त्यांच्याशी गप्पा व्हायच्या , त्यातून गुजराथी लोकांबद्दल खूप गोष्टी कळल्या .
सुशीलाबेन ७० वर्षाच्या तर त्यांचे पती ७५ वर्षांचे .त्या म्हणे “आम्हा दोघांचाच नाही तर आमच्या दोघांच्या आई वडिलांचाही जन्म इथलाच. माझे आजी आजोबा प्रथम केनियात आले ,आता त्यांचा नातू, ही त्यांची पाचवी पिढी आहे .गुजराती लोक जिथे जातील तिथलेच होऊन जातात ,भाषा ,चालीरीती शिकून घेतात .
इंग्रज जेव्हा आपल्या इथे राज्य करत होते ,तेव्हा काही गुजराती व पंजाबी लोकांना रेल्वे च्या कामासाठी केनियात प्रथम घेऊन गेले ,कारण इंग्रज लोक केनियावरही राज्य करत होते .
त्यामुळे गुजराथी लोक, केनियाचा अविभाज्य घटक आहे .सर्व प्रकारचे छोटे-मोठे उद्योग गुजराती लोक तिथे करतात .केनियाच्या अर्थव्यवस्थेत गुजराथी लोकांचा खूप मोठा वाटा आहे .
मी सर्व प्रथम जेव्हा तिथे भाजीला गेले तेव्हा केनियन भाजीवाल्या मला ‘ केम छो ‘ म्हणाल्या .म्हणजे कुणीही भारतीय दिसले की, ते गुजराथीच आहेत असे तेथील लोकांना वाटते .एकदा माझ्या कामवालीला म्हटले , मला गुजराती भाषा येत नाही , तिला खरेच वाटेना .
गुजराथी लोक तेथील किस्वाहिली ही भाषा अख्खलित बोलतात .तसेच काही केनियन लोक ही गुजराती भाषा समजू लागले आहे .तिथे गुजराती लोकांची संख्या काही लाखावर आहे . त्यामुळे तिथे सगळीकडे आपली मंदिरे आहेत .दसऱ्याच्या वेळी होणारा गरबा तर तेथील प्रमुख आकर्षण .
कुठल्याही गुजराथी माणसाला काही अडचण आली तर दुसरे गुजराथी लोक लगेच धावून जातात ,प्रसंगी आर्थिक मदत ही करतात .!
सुशीलाबेनचे पती या वयातही वेफर्स ,चिवडा बनवून विकतात .बऱ्याच गुजराती बायका ,घरगुती स्वरूपात काहीना काही उद्योग करतात. त्यात पापड बनवणे ,डाळ बनवणे इत्यादी .कोणी घरगुती दाबेली बनवून विकते तर कोणी समोसा . त्यामुळे हे’ केनियात एकटे राहत असूनही खाण्याची काही अडचण येत नाही .छान घरगुती मेसचा डबा मिळतो .गुजराती लोकांचे वैशिष्ट्य मला असे जाणवले ते हे की ,स्वभावात असणारी लवचिकता .त्यामुळे ते कुठल्याही देशात मिसळून जातात .
एकदा माझी गुजरात मध्ये राहणारी मैत्रीण सांगत होती ,आमच्या गावात आता फक्त म्हातारे लोक राहतात .सगळे तरुण लोक आता परदेशात राहत आहेत . केनियातील नवीन तरुणाई तर शिकायला अमेरिका ,ऑस्ट्रेलिया ,लंडनलाही जातात व तेथेच स्थायिक होऊन जातात . बऱ्याच जणांकडे Dual सिटीझनशीप असते .त्यामुळे केनिया ही त्यांना आपली दुसरी मातृभूमीच वाटते .
लायन्स क्लब च्या साहाय्याने तेथे बरीच सामाजिक कामेही गुजराती लोक करतात ,जसे गरिबांसाठी शाळा ,दवाखाने इत्यादी .भारतातून नियमित काही डॉक्टरांना बोलावून कॅम्प केले जातात व मोफत सेवा दिली जाते .यातून केनियन लोकांचे आपण काही देणे लागतो , हे ते जाणतात . मी पहिल्यांदा केनियाला जाताना खूप साशंक मन होते ,काही सोयी असतील का..? परंतु गुजराती लोकांमुळे केनियातील जीवन खूप सुखकर झाले आहे ….!!

क्रमशः

-डॉ अंजली पवार

सुशीलाबेन यांच्या ५ पिढ्या …..

Vintage car of kenya

माझी केनिया सफर

भाग क्र. 10

असे आनंदात दिवस घालवत असतांना ,एक दिवस माझी जुनी मैत्रीण संध्या चिमुरकर, जी २२ वर्षांपासून केनियात राहते, ती माझ्याकडे आली व सांगितले की उद्या तुला आमच्या महिला मंडळात व्याख्यान द्यायचंय.
मी मस्त सुट्टी घालवण्याच्या मूड मध्ये असतांना आपल्याला असे अचानक व्याख्यान द्यावे लागेल ,असे वाटलेही नव्हते .कुठल्या विषयावर बोलावे विचार करू लागले ,कारण तिथे संदर्भासाठी काही पुस्तकही नव्हते .मग बुद्धीला ताण दिला व रात्रीतून तयारी केली .दुसऱ्या दिवशी व्याख्यान दिले
”दिनचर्या व आरोग्य ” .सर्व महिलांना ते खूप आवडले . प्रश्न-उत्तराचा कार्यक्रम ही पार पडला .
त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून पेशंट घरी येऊ लागले . घरात पेशंट साठी कुठल्याही प्रकारची तयारी नाही… पण सल्ला व औषधे लिहून देणे ,अशा स्वरूपात घरगुती दवाखाना ही चालवला .
तेथील महिला मंडळ खूपच जुने असून ,१९३४ पासून अव्याहतपणे कार्यरत आहे . आपल्या भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी ,त्या महिला मंडळाच्या सन्माननिय सदस्य होत्या . मंडळाकडे स्वतःची मोठ्ठी जागा ,प्रशस्त हॉल आहे . सामाजिक काम म्हणून गरीब मुलांसाठी शाळाही चालवतात . केनियातील भारतीय स्रिया एवढे सामाजिक काम करतात हे बघून ,परत एकदा स्त्री शक्तीची जाणीव झाली .
मी गेले तेव्हा, तिथे गणपती उत्सवाचीही धूम धाम चालू होती . नैरोबी येथे १९५० पासून महाराष्ट्र मंडळ कार्यरत आहे . गुजराती लोकांप्रमाणे आपले मराठी लोकही सण साजरे करण्यात मागे नाहीत हे जाणवले . तिथे आपले सर्व मराठी सण साजरे केले जातात ,जसे दिवाळी ,रंगपंचमी ,गणपती उत्सव, ई.
गणपतीसमोर छान सजावट केली होती ,ढोल ताशांनी गणपतीचे स्वागत बघून मी तर हरखून गेले . गणपती उत्सवाच्या निमित्ताने बऱ्याच स्पर्धा आयोजित केल्या होत्या .जेवायला छान महाराष्ट्रीय पध्दतीचे रुचकर जेवण ही असायचे . हे सर्व बघून, असे वाटायचे की आपण भारतात तर नाही..??

क्रमशः

डॉ. अंजली पवार

माझी केनिया सफर

भाग क्र. 9

रोज सकाळी ट्रॅकवर फिरण्याची सवय…त्यामुळे तिथे ट्रॅक नसला तर रोड वर फिरू असे ठरवलेच होते ,परंतु घराजवळच गुजराती लोकांनी चालू केलेला जिमखाना आहे , तिथे मला छोटा ट्रॅक मिळाला.जाता येता आजूबाजूचे निरीक्षण ही करता यायचे .जिमखान्यावर ट्रॅक व्यतिरिक्त , टेनिस कोर्ट ,स्वीमिंग टॅंक ,व जिम ही होती .कधी कधी तिथे पार्टी ही असायची .
तिथून जवळच पाट वाहत होता ,तिथे छान कमळे फुलली होती .विविध रंगाची फुले दिसायची .पक्षी तर खूप रंगीबेरंगी होते .
हे’ सकाळी ऑफिसला गेले की मी व माझी मैत्रीण झालेली शेजारीण छायाबेन फिरायला निघायचो.येतांना कधी भाजी घेऊन ये तर कधी किराणा .आल्यावर परत तिच्याकडे किंवा माझ्याकडे गप्पा व चहा ची मैफिल .
शेजारी येणाऱ्या कामवाल्या जॅकलिन व सुझान शी ही गप्पा व्हायच्या .त्यातून त्यांच्या चालीरीती कळायच्या .कधी जवळच असलेल्या मॉल मध्ये फिरून यायचे .कारमधून फिरण्यापेक्षा पायी फिरायला मला मजा यायची कारण पायी फिरतांना त्यांच्या जीवनातले खूप बारकावे कळायचे .
रोज दारावर येणारी भाजीवालीशीही मी गप्पा मारायची..तिला एक दिवस म्हटले , “तुला किती ग मुले” ? ती म्हणे एकच मुलगी .दुसरी पण मुलगीच हवी मला .तिथे मुलगाच हवा हा अट्टाहास ही नाही त्यामुळे मुलगा मुलगी समतोल अजून तरी टिकून आहे .
शेजारच्या बंगल्यात ब्रह्मकुमारी आश्रम ही होता .काहीजण तिथे मेडिटेशन करायचे .स्वाध्याय परिवारही तिथे आहे .आठवड्यातून एकदा लोक त्यासाठी एकत्र जमायचे .
मी कधी कधी संध्याकाळी चहा घेत घरासमोरच्या पारावर बसून स्वामी, छावा ही ऐतिहासिक पुस्तके वाचायची.
TV वर तिथलेही चॅनेल्स दिसायचे व काही हिंदी चॅनेल्स.आम्ही ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ व ‘तेनाली रामा’ कधी कधी बघायचो .माझ्या आवडीचा विषय होता ,रेडिओ ऐकणे .तिथे २, २४ तास चालणारे, हिंदी रेडिओ चॅनेल्स आहेत .त्यातील एक आहे East FM. त्यावर छान जुनी गाणी असायची .त्यावर कधी स्पर्धा ही असायची .मी त्यात भाग घेऊन बक्षीसही मिळवली .योगायोगाने आमच्या इथे तेथील ,माझी आवडती , East FM या चॅनेल वर असणारी, पाकिस्तानी RJ परवीन आदम Thika मध्ये नवरात्री च्या प्रोग्रॅमसाठी आली होती .तिच्याशी माझी भेट झाली . चाहत्यांनमध्ये ती तिथे खूपच आवडती आहे .अशावेळी कुठेही धर्म व देशाच्या भिंती आड येत नाही .सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात .
गेल्या गेल्या मला प्रश्न पडला होता की घरात एकट्याने दिवसभर काय करायचे..? पण या सर्व गोष्टींमुळे, वेळ कसा जायचा कळायचे सुद्धा नाही…

क्रमशः

डॉ अंजली पवार

छायाबेन सोबत…

केनियन भाजीवाली सोबत….

RJ परवीन आदम सोबत…

माझी केनिया सफर

भाग क्र. 8

“ये तो सिर्फ ट्रेलर है….पिक्चर अभि बाकी है…!! ”
असे चोरांनीं म्हटले तर नसावे ?
अशी वेळ लवकरच आमच्यावर आली. आम्हाला कंपनीने ‘जुजा’ या छोट्या गावी इंग्रज कालीन स्वतंत्र असे ९ बंगले होते, तिथे राहायची व्यवस्था केलेली होती. मोठा निसर्गसंपन्न परिसर व त्याला बाहेरुन तार कंपाऊंड होते.
रात्रीची २.३० ची वेळ. घरात आम्ही सर्वजण गाढ झोपलेलो असतांना ,मला घरात कुणीतरी हळूहळू बोलत असल्याचे जाणवुन जाग आली .बघितले तर ,आमच्या बेडरूम मध्ये २ जण हातात जाड लोखंडी गज घेऊन, लाकडी कपाटात काहीतरी शोधत असल्याचे दिसले . मला काही उलगडा होईना .मग मी ह्यांना उठवून विचारले , “हे लोक इथे काय करताहेत ?” हे तर माझ्यापेक्षा जास्त गाढ झोपेत…यांना वाटले आपण काहीतरी स्वप्न बघतोय की काय ?
मग आमचे बोलणे ऐकून त्या घरात घुसलेल्या माणसांनी ,आम्हा दोघांना धमकवण्यास सुरुवात केली. ‘कॉट वरच बसून राहा , सर्व सोने, पैसे काढून द्या, तुम्ही काढून दिले नाही…व आम्ही शोधल्यावर काही सापडले ,तर तुम्हाला स्वर्गात पाठवू.. ‘
परत एकदा शरणागती पत्करल्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. Emergency सायरनचे बटन माझ्याजवळ होते , ते बघून त्यांनीं सांगितले , कुठल्याही प्रकारची हुशारी करू नका .
ह्यांनीं त्यांना सांगितले ,’ मुले झोपली आहेत ,त्यांना काही करू नका ‘… तर ते म्हणे ,” नाही नाही ,काही करणार नाही ,आम्हालाही छोटी मुले आहेत .”
मी सर्व सोने , पैसे त्यांना गुपचूप काढून दिले .
नंतर त्यांनी मुलांच्या बेडरूम कडे मोर्चा वळवला . तेथील मोठ्या बॅगांमध्ये सर्व नवीन कपडे भरून ,हॉल मधील TV ,DVD , Music System, Landline फोन घेऊन बाहेर उभ्या असलेल्या दोघांकडे दिले .तारेच्या कंपाऊंड बाहेर छोटा टेम्पो होता ,त्यात सर्व सामान भरले .जातांना आमच्याजवळ येऊन ‘” तुम्ही आता शांत झोपा” म्हणून निघून गेले . ते निघून गेल्यावरही आम्ही दोघे कॉट वरच सुन्नपणे बसून राहिलो.
मग बाहेर झाडाला बांधून ठेवलेला watchman ओरडू लागला . मुलगी त्या आवाजाने जागी झाली, तिने खिडकीतून बाहेर डोकावले, तेव्हा तिला ३-४ चोर बॅगा घेऊन जाताना दिसले. बाहेर हॉल मध्ये आली तर सर्व हॉल रिकामा दिसत होता. घाबरून ती आमच्याकडे आली. बाहेर जाऊन बघितले तर गॅस कटर ने खिडकीचे गज तोडून ते आत आलेले होते. तरी देवाचे आभार मानले की..दोन्ही वेळा आम्हा चौघांच्या केसालाही त्यांनीं धक्का लावला नव्हता.
ध्यानि मनि स्वप्नी नसलेले , सत्यात घडले होते !!!

क्रमशः

डॉ अंजली संजीव पवार

माझी केनिया सफर…..

भाग क्र. 7

जीवाला जीव देणारी माणसे जशी भेटली ,तशी जीवावर उठणारी माणसेही केनियात भेटली.
आम्ही दोन्ही मुलांना घेऊन जेव्हा केनियात राहात होतो तेव्हाचा प्रसंग ,आज ही आठवला तरी अजून ही अंगावर शहारा येतो.
रविवारचा सुट्टीचा दिवस होता. मुले नुकतीच उठली होती .ऑफिसला जरी सुट्टी असली तरी अहोंना ऑफिसला एक चक्कर मारायची सवय . सकाळचे ८ वाजले होते. ते ऑफिसला निघाले . मलाही भाजी घ्यायची असल्याने मी पण बरोबर निघाले. मुले कार्टून बघण्यात दंग होती.
मग आम्ही घरापासून 20 km लांब असलेल्या ऑफिसला निघालो .अर्ध्या रस्त्यात पोहचल्यावर , आमच्या पुढची कार थांबलेली ,त्या कारचे पुढचे दोन्ही दरवाजे सताड उघडे ,व दोन्ही बाजूला दोन माणसे आतल्या माणसांशी काहीतरी बोलत होती .
ते बघून हे म्हणे ,काय मूर्खासारखे भररस्त्यात उभे राहून गप्पा मारताहेत ,आणि स्पीड ब्रेकर असल्याने आमची गाडी हळू झाली .
तेव्हढ्यात ती बाहेरुन बोलत असलेली दोन केनियन माणसे धावत आम्हाला काही कळायच्या आत आमच्या गाडी जवळ आली.
आम्हा दोघांनाही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले व आम्ही थोड्या उघड्या असलेल्या काचा पटकन बंद केल्या .ती दोन माणसे पिस्तूल दाखवून दारावर हाताने थापा मारू लागली म्हणून आम्ही त्यांना पूर्ण शरण जायचे ठरवले. खिडकीच्या काचा खाली घेतल्याबरोबर त्या दोघांनी आम्हा दोघांच्या डोक्यावर पिस्तुल रोखले.
यांच्याकडून त्यांनीं मोबाईल हिसकावून घेतला . पाकीट काढून घेतले . माझ्या बाजूच्या दुसऱ्या माणसाने माझ्या कानातील सोन्याची रिंग खसकन ओढली .बोटातील अंगठीही ओढू लागला …ती लवकर निघत नव्हती ..तशीच ओढून काढून दिली व स्वतःहून दुसरी कानातील रिंग काढून दिली .
या अवघड प्रसंगातही माझा मोबाईल वाचवण्याचा प्रयत्न म्हणून पटकन मी मोबाईल पायाजवळ फेकला…पण त्याच्या पिस्तूलला घाबरून फेकलेला मोबाईल उचलून स्वतःहून त्याच्या हातात दिला .
हे सर्व झाल्यावर चोर आम्हाला म्हणे ‘रस्त्यात कुठे थांबू नका.’
तशाच विमनस्क परिस्थितीत आम्ही पुढे ऑफिसला पोहचलो . गेटच्या बाहेर गाडी लावली, कारण लगेच निघणार होतो . मी गाडीतच बसून राहिले.
पती गेटच्या आत गेले , पण मी त्या प्रसंगाने इतकी घाबरले होते की मला गाडीत एकटीने बसणें शक्य होईना .मी यांच्यामागे आत गेले .
हे मला बघताच म्हटले ,”अग गाडीची चावी आत राहीली ना ” !!
मला अपराधी वाटू लागले . शिवाय सकाळी सकाळी मेकॅनिक ही मिळेना..कसातरी शोधून आणला .त्याने लॉक उघडून दिले . आणि आम्ही कुठेही न थांबता थेट घरी पोहचलो. आम्ही ना कुठे पोलीस स्टेशन ला गेलो ना कुणाला फोन केला.
मी या प्रसंगाने खूप हादरलेले होते.. पण याच विरुद्ध माझा , डोके थंड ठेवणारा नवरा , घरात जाताच मुलांशेजारी बसून , स्वतः मूल होईन Tom & Jerry बघत हसू लागला ,आणि मी त्याला कोपरापासून हात जोडले….!!!🙏

क्रमशः

डॉ अंजली संजीव पवार